लोहगाव–किनाळा रस्त्याच्या मजबुतीकरणात निकृष्ट कामाचा आरोप; नागरिकांत तीव्र संताप

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा



*नायगाव बाजार -- गोविंद नरसीकर*
येथून जवळच असलेल्या लोहगाव ते किनाळा या महत्त्वाच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप नागरिक व शेतकरी वर्गातून करण्यात येत असून या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अभियंते व ठेकेदार यांच्या संगनमताने अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम न करता मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याने रस्ता किती दिवस टिकणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे चार किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर अत्यल्प प्रमाणात डांबर टाकून कामाचा केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. ‘निकृष्ट दर्जाचा उत्कृष्ट नमुना’ अशी उपहासात्मक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून सध्या तयार होत असलेल्या रस्त्यावर सहज पायाने लाथ मारल्यास डांबर उखडून निघत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारे तयार झालेला रस्ता पुढे किती दिवस टिकेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
बिलोली तालुक्यातील लोहगाव ते किनाळा हा रस्ता किनाळा, रामतीर्थ, बिजूर, कामरसपल्ली आदी गावांतील नागरिकांना तालुक्याला जाण्यासाठी जवळचा व सोयीचा मार्ग मानला जातो. तसेच लोहगाव, किनाळा आणि जिगळा परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतीकडे जाण्या-येण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या मजबुतीकरणाची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर काम सुरू झाल्यानंतरही दर्जाहीन काम होत असल्याचे चित्र समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच दर्जाहीन पद्धतीने सुरू असलेले रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा रस्त्यावर खडी व माती टाकून आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या कामातील कथित गैरप्रकारामुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

“आम्हाला अधिकार नाही!” — मग बळेगावची माती लुटण्याचे अधिकार कुणाला?

सर्वाधिक एमबीबीएस सिलेक्शन देण्यात आयआयबी ठरणार महाराष्ट्रात अव्वल